Monday, 14 April 2025

रेनट्री (Fade Away)

 




हे समोर दिसणारं झाड काहीच दिवसांचं साथीदार असणार आहे. काही दिवसांनी रस्त्याचं रुंदीकरण होताना हे झाड तोडणार आहेत. प्रस्तावित तुटणाऱ्या झाडांवर त्या संबंधित लोकांनी नंबर टाकले आहेत. या झाडावरही लाल शाईने एक नंबर टाकला आहे. अशी झाडं मुळासकट उपटून नवीन ठिकाणी लावत आहेत असं गावाच्या कमानीजवळ लावलेल्या अख्ख्या मोठ्या झाडांवरून वाटतं. झाडं तुटण्याचा परिमाण होऊन किंवा झाडं तुटनं हे निमित्त होऊन, एखाद्याचा मानसिक - वैचारिक आधार तुटून त्या व्यक्तीत भंगलेपण येऊन, तो पिसाट सुटतो असं "राडा"मध्ये वाचलेलं. त्या कादंबरीत असणारी झाडं ही दांभिक, कचाकड्या जगापासून सुटकेची जागा होती कादंबरीतील मध्यवर्ती पात्राला. तो आधार मुळापासून निखळून गेल्यावर अधांतरी असल्याच्या चिडीतून आजपर्यंत खोल पुरून ठेवलेली विद्रोहाची आग खूप अस्ताव्यस्त पसरत जाते. 

खरंच, आता हे झाड नसणार या विचाराने थोडं भकास वाटलं. निरार्थकापणात अर्थ शोधताना कित्येकदा संधिप्रकाशात या झाडांनं किती शांतता दिलीय. कोरोना काळात रोज सकाळी टेरेसवर या झाडाच्या बाजूला बसून green टी पित मी "गीता" वाचली होती. पाच वर्षं झाली त्याला. सध्या डॉ. आंबेडकरांच "Buddha and his Dhamma" वाचतोय, सोबत ओशोचं "एस धम्मो सनंतानो" ऐकतोय. नोव्हेंबर - डिसेंबर पासून दोन वेळा गोएंका गुरुजींची विपश्यनेची दहा दिवसांची सिरीज दोनदा ऐकली. जे कृष्णमूर्तींचे लेक्चर्स ऐकतोय. आज नऊ दिवसांच्या सुटीतील तिसरा दिवस आहे. या सगळ्याचा तात्कालिक परिणाम होतो, पण दीर्घकाळ टिकणारा परिणाम अजून होत नाही. असो.

मागं american beauty पाहून त्यातील quote खुप आवडलेला. "Sometimes there is so many beauty in the world that I can't take it...my heart caves in..." असं काहीतरी. मला आकाशातील रंगांच्या पार्श्वभूमीवर हे झाडं पाहून अगदी या quote च्या जवळ जाणारं काहीतरी वाटलं होतं. 




हाच तो फोटो. दोन आठवड्यात ५ वर्ष होतील. 

आणखी एक instagram वर अपलोड केलेला...



माझ्या बुद्धाच्या शोधाला सुरुवात ठरलेल्या गोष्टीला एक वर्ष होईल या महिन्यात. सकाळी उठल्या उठल्या जाणवणारी, दुपारी जास्त वेळ साचून राहिलेली निरर्थकता कशी हाताळायची अजून समजत नाही. जे कृष्णमूर्ती सांगतात ते ऐकत असताना आणि ते ऐकल्यापासून काही काळापर्यंत त्याचा प्रभाव असतो. तो सगळ्याच जगण्यात कसा आणता येईल किंवा तो तसा आणता येईलच का हा प्रश्न आहे.

सुभाष अवचट यांचं "रफ स्केचेस", प्रभाकर बरवे यांचं "चित्र वस्तू विचार" आणि इतर २-३ पुस्तकं "वाचनवेल पुस्तकं भिशी" वर मागवून एक वर्ष होत आलं., अजून पुस्तकं मिळाली नाहीत. दोन्ही पुस्तकं माझ्या शोधाला पूरक आहेत. बरवे सरांचं "कॅनव्हास" आणि अवचट सरांचे लोकसत्तामधील लेख वाचले आहेत. गेल्या काही दिवसात "फ्रीडा" पाहिला, "रेजिंग बुल", "ऑन द वॉटर फ्रंट", "apocalypse now" पाहिले. फिकशन पाहायचं ज्या (काल्पनिक) कारणामुळे बंद केलेलं, त्यांचं अस्तित्व जाणवलं नाही. 

खुप जास्त, सर्वव्यापी आणि प्रचंड वेगाने भवतालात बदल होत आहेत. पुण्यात मेट्रो झाल्या, होत आहेत. दिवे घाटात नवा रस्ता बांधनं सुरू आहे. तिथपासून ते सासवड, जेजुरी, लोणंद पर्यंत रस्त्याचं काम सुरू आहे. मग फलटण ते अगदी घराच्या दारापर्यंत रस्त्याचं काम सुरू आहे, त्या कामातच ते रेनट्रीचं झाड तोडणार आहेत. ऑफिसच्या कामाची जागा बदलली, नवी इमारत झाली, नवी केबिन मिळाली. बदलीसाठी अर्ज दिला आहे. दुपारीच रूम ओनरचा फोन आला "अकरा महिने संपले agreement चे" सांगायला. मी सलमानचे पिक्चर तितक्या उत्साहाने पाहत नाही. फिरायची उमेद जात चालली आहे. 

काही दिवसांनी बसेस (यष्ट्या) बंद होतील. रस्त्यामुळे घरात बदल होईल, पुढच्या भागाला एकदम लागून रस्ता जाईल. घराच्या भवतलात बदल होईल. गावात बदल होईल. भौतिक बदल आणि त्यासोबत मानसिक, आणि सामाजिक बदल होतील. झाड गेल्यावर आणि रस्ता झाल्यावर मला निवांत क्षणी वर आलो तर मला नेमकं काय वाटेल ? एवढ्या मोठ्या आणि नव्या रस्त्याची इतकी जास्त गरज आहे का? असा रस्ता असावा हे कसं ठरवलं जातं? त्याचे निकष काय असतात? "किनशीचा चौक" खरा होईल का? एकदम सुरुवातीला रस्त्याचं काम सुरू होणार होतं त्यावेळी रस्त्याच्या कंत्राटदाराचं एक वाहन गावात आलेलं मी पाहिलं होतं. त्याचा फोटो काढलेला, समोर होऊ घातलेल्या प्रचंड मोठ्या बदलाचं प्रतीक म्हणून...




२३ नोव्हेंबर २०२४ ला काढलेत फोटो. प्रचंड वेगाने काम सुरू आहे रस्त्याचं. 

लहानपणी एकदा डांबर टाकणारं मोठं वाहन डांबर टाकत घरासमोरून गेलं होतं. तेव्हा ते कसं डांबर टाकत आहे ते पाहण्यात मजा आली होती. त्याच काळात दोन मित्रांनी मिळून पैसे जमवून मोटोरोलाचा एखाद्या विटेच्या अर्ध्या आकाराचा मोबाईल घेतला होता. बहुतेक एका आगामी नेत्याच्या हातात तेव्हा नोकियाचा बेसिक मोबाईल पाहिला होता. मग रेंजसाठी छतावर उभे राहून बोलणारे एकजण पाहिले होते. त्या डांबरी रस्त्याच्या कामापासून ते आजच्या सिमेंटच्या रस्त्याच्या काळापर्यंत तंत्रज्ञानात किती मोठी क्रांती झाली. नोकिया 1110 पासून ते AI पर्यंत. मी साधारण २००८ मध्ये पहिल्यांदा नोकिया २३१० घेतला होता. पुण्यात "सुभिक्षा" नावाची फेमस मोबाईल ची दुकानं होती, तिथे घेतला होता. Bounce ची game होती त्यात, खूप खेळली ती. मग २०१२ मध्ये Samsung Galaxy Fit घेतला होता, पाहिला स्मार्टफोन. अवघी १२-१३ वर्ष झाली smartphone येऊन. मी हे लिहितोय, तेव्हापासून दहा वर्षांनी आणखी केवढेच मोठे बदल झाले असतील तंत्रज्ञानात! पण तेव्हा शोध संपला असेल का? तंत्रज्ञानामुळे काम आणि परिणामी जगणं आणखी वाईट झालं असेल का? इतर परिणामांबद्दल सध्या विचार नाही, पण तो विचार दमावणारा असेल. 


रेनट्री. शाळेकडे रेनट्री ची झाडं होती. त्याच्या शेंगा खाली पडलेल्या असायच्या. मग त्या गोळा करून दगडाने ठेचून ठेचून त्याची पेस्ट करून मग ती गोल करत, दाबून दाबून त्याचा चेंडू करायचो. वजनाने हलका पण टणक चेंडू. बदल. मित्र भेटत नाहीत (की मित्रांना मी भेटत नाही?) किती काट छाट होत होत लहान लहान होत जाणारा एकांत, आणि हे अंगावर येणारे बदल.