Monday, 14 April 2025

रेनट्री (Fade Away)

 




हे समोर दिसणारं झाड काहीच दिवसांचं साथीदार असणार आहे. काही दिवसांनी रस्त्याचं रुंदीकरण होताना हे झाड तोडणार आहेत. प्रस्तावित तुटणाऱ्या झाडांवर त्या संबंधित लोकांनी नंबर टाकले आहेत. या झाडावरही लाल शाईने एक नंबर टाकला आहे. अशी झाडं मुळासकट उपटून नवीन ठिकाणी लावत आहेत असं गावाच्या कमानीजवळ लावलेल्या अख्ख्या मोठ्या झाडांवरून वाटतं. झाडं तुटण्याचा परिमाण होऊन किंवा झाडं तुटनं हे निमित्त होऊन, एखाद्याचा मानसिक - वैचारिक आधार तुटून त्या व्यक्तीत भंगलेपण येऊन, तो पिसाट सुटतो असं "राडा"मध्ये वाचलेलं. त्या कादंबरीत असणारी झाडं ही दांभिक, कचाकड्या जगापासून सुटकेची जागा होती कादंबरीतील मध्यवर्ती पात्राला. तो आधार मुळापासून निखळून गेल्यावर अधांतरी असल्याच्या चिडीतून आजपर्यंत खोल पुरून ठेवलेली विद्रोहाची आग खूप अस्ताव्यस्त पसरत जाते. 

खरंच, आता हे झाड नसणार या विचाराने थोडं भकास वाटलं. निरार्थकापणात अर्थ शोधताना कित्येकदा संधिप्रकाशात या झाडांनं किती शांतता दिलीय. कोरोना काळात रोज सकाळी टेरेसवर या झाडाच्या बाजूला बसून green टी पित मी "गीता" वाचली होती. पाच वर्षं झाली त्याला. सध्या डॉ. आंबेडकरांच "Buddha and his Dhamma" वाचतोय, सोबत ओशोचं "एस धम्मो सनंतानो" ऐकतोय. नोव्हेंबर - डिसेंबर पासून दोन वेळा गोएंका गुरुजींची विपश्यनेची दहा दिवसांची सिरीज दोनदा ऐकली. जे कृष्णमूर्तींचे लेक्चर्स ऐकतोय. आज नऊ दिवसांच्या सुटीतील तिसरा दिवस आहे. या सगळ्याचा तात्कालिक परिणाम होतो, पण दीर्घकाळ टिकणारा परिणाम अजून होत नाही. असो.

मागं american beauty पाहून त्यातील quote खुप आवडलेला. "Sometimes there is so many beauty in the world that I can't take it...my heart caves in..." असं काहीतरी. मला आकाशातील रंगांच्या पार्श्वभूमीवर हे झाडं पाहून अगदी या quote च्या जवळ जाणारं काहीतरी वाटलं होतं. 




हाच तो फोटो. दोन आठवड्यात ५ वर्ष होतील. 

आणखी एक instagram वर अपलोड केलेला...



माझ्या बुद्धाच्या शोधाला सुरुवात ठरलेल्या गोष्टीला एक वर्ष होईल या महिन्यात. सकाळी उठल्या उठल्या जाणवणारी, दुपारी जास्त वेळ साचून राहिलेली निरर्थकता कशी हाताळायची अजून समजत नाही. जे कृष्णमूर्ती सांगतात ते ऐकत असताना आणि ते ऐकल्यापासून काही काळापर्यंत त्याचा प्रभाव असतो. तो सगळ्याच जगण्यात कसा आणता येईल किंवा तो तसा आणता येईलच का हा प्रश्न आहे.

सुभाष अवचट यांचं "रफ स्केचेस", प्रभाकर बरवे यांचं "चित्र वस्तू विचार" आणि इतर २-३ पुस्तकं "वाचनवेल पुस्तकं भिशी" वर मागवून एक वर्ष होत आलं., अजून पुस्तकं मिळाली नाहीत. दोन्ही पुस्तकं माझ्या शोधाला पूरक आहेत. बरवे सरांचं "कॅनव्हास" आणि अवचट सरांचे लोकसत्तामधील लेख वाचले आहेत. गेल्या काही दिवसात "फ्रीडा" पाहिला, "रेजिंग बुल", "ऑन द वॉटर फ्रंट", "apocalypse now" पाहिले. फिकशन पाहायचं ज्या (काल्पनिक) कारणामुळे बंद केलेलं, त्यांचं अस्तित्व जाणवलं नाही. 

खुप जास्त, सर्वव्यापी आणि प्रचंड वेगाने भवतालात बदल होत आहेत. पुण्यात मेट्रो झाल्या, होत आहेत. दिवे घाटात नवा रस्ता बांधनं सुरू आहे. तिथपासून ते सासवड, जेजुरी, लोणंद पर्यंत रस्त्याचं काम सुरू आहे. मग फलटण ते अगदी घराच्या दारापर्यंत रस्त्याचं काम सुरू आहे, त्या कामातच ते रेनट्रीचं झाड तोडणार आहेत. ऑफिसच्या कामाची जागा बदलली, नवी इमारत झाली, नवी केबिन मिळाली. बदलीसाठी अर्ज दिला आहे. दुपारीच रूम ओनरचा फोन आला "अकरा महिने संपले agreement चे" सांगायला. मी सलमानचे पिक्चर तितक्या उत्साहाने पाहत नाही. फिरायची उमेद जात चालली आहे. 

काही दिवसांनी बसेस (यष्ट्या) बंद होतील. रस्त्यामुळे घरात बदल होईल, पुढच्या भागाला एकदम लागून रस्ता जाईल. घराच्या भवतलात बदल होईल. गावात बदल होईल. भौतिक बदल आणि त्यासोबत मानसिक, आणि सामाजिक बदल होतील. झाड गेल्यावर आणि रस्ता झाल्यावर मला निवांत क्षणी वर आलो तर मला नेमकं काय वाटेल ? एवढ्या मोठ्या आणि नव्या रस्त्याची इतकी जास्त गरज आहे का? असा रस्ता असावा हे कसं ठरवलं जातं? त्याचे निकष काय असतात? "किनशीचा चौक" खरा होईल का? एकदम सुरुवातीला रस्त्याचं काम सुरू होणार होतं त्यावेळी रस्त्याच्या कंत्राटदाराचं एक वाहन गावात आलेलं मी पाहिलं होतं. त्याचा फोटो काढलेला, समोर होऊ घातलेल्या प्रचंड मोठ्या बदलाचं प्रतीक म्हणून...




२३ नोव्हेंबर २०२४ ला काढलेत फोटो. प्रचंड वेगाने काम सुरू आहे रस्त्याचं. 

लहानपणी एकदा डांबर टाकणारं मोठं वाहन डांबर टाकत घरासमोरून गेलं होतं. तेव्हा ते कसं डांबर टाकत आहे ते पाहण्यात मजा आली होती. त्याच काळात दोन मित्रांनी मिळून पैसे जमवून मोटोरोलाचा एखाद्या विटेच्या अर्ध्या आकाराचा मोबाईल घेतला होता. बहुतेक एका आगामी नेत्याच्या हातात तेव्हा नोकियाचा बेसिक मोबाईल पाहिला होता. मग रेंजसाठी छतावर उभे राहून बोलणारे एकजण पाहिले होते. त्या डांबरी रस्त्याच्या कामापासून ते आजच्या सिमेंटच्या रस्त्याच्या काळापर्यंत तंत्रज्ञानात किती मोठी क्रांती झाली. नोकिया 1110 पासून ते AI पर्यंत. मी साधारण २००८ मध्ये पहिल्यांदा नोकिया २३१० घेतला होता. पुण्यात "सुभिक्षा" नावाची फेमस मोबाईल ची दुकानं होती, तिथे घेतला होता. Bounce ची game होती त्यात, खूप खेळली ती. मग २०१२ मध्ये Samsung Galaxy Fit घेतला होता, पाहिला स्मार्टफोन. अवघी १२-१३ वर्ष झाली smartphone येऊन. मी हे लिहितोय, तेव्हापासून दहा वर्षांनी आणखी केवढेच मोठे बदल झाले असतील तंत्रज्ञानात! पण तेव्हा शोध संपला असेल का? तंत्रज्ञानामुळे काम आणि परिणामी जगणं आणखी वाईट झालं असेल का? इतर परिणामांबद्दल सध्या विचार नाही, पण तो विचार दमावणारा असेल. 


रेनट्री. शाळेकडे रेनट्री ची झाडं होती. त्याच्या शेंगा खाली पडलेल्या असायच्या. मग त्या गोळा करून दगडाने ठेचून ठेचून त्याची पेस्ट करून मग ती गोल करत, दाबून दाबून त्याचा चेंडू करायचो. वजनाने हलका पण टणक चेंडू. बदल. मित्र भेटत नाहीत (की मित्रांना मी भेटत नाही?) किती काट छाट होत होत लहान लहान होत जाणारा एकांत, आणि हे अंगावर येणारे बदल. 






Sunday, 21 January 2024

२१-२२ जानेवारी २०२४

 

 २१-२२ जानेवारी २०२४

नुकताच ड्राफ्ट मधील एक ब्लॉग वाचला. जवळपास ९ वर्षांनंतर सवयीं च्या बाबतीत मी तसाच!!
असो. 


आजच्या महत्त्वाच्या नोंदी.
आज पुण्यात टिंगरे नगर ते फिनिक्स मॉल गाडी घेऊन गेलो.
रस्त्यात बऱ्याच ठिकाणी भगवे झेंडे लावलेले दिसले. 
मधूनच एका गाडीत गणपती नेतात तसा रामाचा पुतळा घेऊन काही लोक गेले, जोरात "जय श्री राम" घोषणा देत.
त्याच्या काही वेळा पूर्वी "भारत का बच्चा बच्चा" हे गाणं रस्त्यावर कुठेतरी ऐकू आलं होतं.
रस्त्याच्या दुतर्फा काही पोस्टर्स दिसले रामाचे - कार्यक्रमाचे. 
काल बाल - रामाचे (राम लल्ला) फोटो बऱ्याच लोकांच्या स्टेटस ला पाहिले. फेसबुकवर साताऱ्याच्या कुठल्यातरी गृपवर तो बाल - रामाचा (राम लल्ला) फोटो आणि चाफळच्या बाल - रामाचा फोटो यातील साधर्म्य दर्शविणारा एडीटेड फोटो होता. राम लल्लाच्या मूर्तीवरील  प्रभावळीचा अर्थ विवरण करणारे फोटोही समाज माध्यमांवर फिरत होते. सकाळच्या फेसबुक हॅण्डल वर share केलेला फोटो -




वातावरण हळू हळू राममय होत गेलेलं जाणवतं. साधारण २०१८ पासून हे व्हायला सुरुवात झाल्याचं माझ्याच एका जुन्या नोंदीवरून मला वाटतं. अर्थात यात काहीच विशेष किंवा धक्कादायक नाही. राममंदिर आणि बाबरी मशिदीच्या खटल्याचा निकाल शांततेत मान्य झाला. त्यानंतर मंदिर निर्माण होणार ही चर्चा आणि लगोलग मंदिर निर्माण सुरू झालं.

यादरम्यान समाजजीवनात रामाचं स्थान मध्यवर्ती येऊ लागलं. सिनेमाच्या संदर्भात मला जाणवलेला बदल एक सिनेप्रेमी म्हणून मला नोंदवावा असा वाटतो. हा बदल मला RRR मध्ये पहिल्यांदा दिसला. राम चरण तेजाला climax ला रामाच्या अवतारात दाखवलं तेव्हा पब्लिकची reaction अफाट होती. पब्लिक ला हे फुल आवडलं होत. मग ओम राऊतच्या आदिपुरुष ची हवा तयार होऊ लागली, कोरोना दरम्यान जुनी रामायण लोकांच्यात परत प्रसिद्ध झाली. अक्षयकुमारचा रामसेतू आला, त्याला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. अधून मधून "भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा" हे ऐकू येत होत, ते खूपच लोकप्रिय झालेलं दिसलं. अगदी वर्ल्ड कप मध्येही ते वाजवलं जात होतं आणि लोकांच्यात हर्षाची लाट उसळत होती. मग आदिपुरूष चा ट्रेलर आला, त्यातील सुमार CGI मुळं खूप ट्रोल करण्यात  आलं. मग सिनेमा रिलीज झाला, त्यालाही ट्रोल करण्यात आलं. अर्थात दोन्ही मुख्य बाजुंकडून* हे ट्रोलिंग झालं. कुणाल काम्राने आनंद पटवर्धन यांनी "राम के नाम" ही documentary त्याच्या अकाऊंटवरून share केली. आजच (दि. २१ जानेवारी) हनुमान हा दाक्षिणात्य सिनेमा पाहून आलो. त्यात हनुमान जेव्हा दाखवला गेला तेव्हा पब्लिक ची प्रतिक्रिया अफाट होती. मीपण त्या सिन ने प्रभावित झालो.  रामा बद्दल च आणखी एक सिनेमा ३९५ नावाचा सिनेमा रिलीज झाला आहे. रवी जाधव यांच्या माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या बायोपिक मध्ये कैलाश खेर ने लिहिलेलं,संगीत दिलेलं आणि गायलेल गाणं काल युट्यूबवर पाहिलं. चांगल वाटलं गाणं. सुधीर फडके यांच्यावरील आगामी बायोपिक च्या टिजर मध्येही रामावरील एका गाण्याच्या काही ओळी ऐकायला मिळतात. खूप सुंदर आहेत. "राम सियाराम सियाराम जय जय राम"  हे गाणं ही खूपच प्रसिद्ध आणि लोकप्रिय झालं. काही मित्रांची ringtone आणि कॉलर टोन पण आहे ती. ही सगळी उदाहरणं सांस्कृतिक जीवनात आणि विशेषतः सिनेमा - संगीतामध्ये राम केंद्रस्थानी आला असल्याचं दाखवतात. असाच राम हा विषय चर्चांमध्ये, राजकारणामध्ये आणि एकंदरीतच समाजजीवनात केंद्रस्थानी आला आहे, असं दिसून येतं.

( *प्रो मोदी - हिंदुत्व इत्यादी आणि अँटी मोदी - हिंदुत्व इत्यादी या दोन मुख्य बाजू. अर्थात अशा दोन बाजुंमध्ये विभागणी करणं हे अरीसुलभिकरण आणि सरसकटीकरण होत आहे, पण इथ मुख्य मुद्दा बाजू किती वा कोणत्या हा नसून, मुद्दा मत व्यक्त करण्याचा नसून मुद्दा निरीक्षण नोंदवण्याचा आहे. दोन मुख्य बाजूंचा इथून पुढे "प्रो" आणि "अँटी" असा उल्लेख इथून पुढं केलेला आहे. आता कुठली बाजू योग्य, मी कुठल्या बाजूला झुकलेला या विषयांची चर्चा मला इथ करायची नाही. मला फक्त काही निरीक्षण नोंद करायची आहेत.  कुठली बाजू योग्य की आणि कुठली अयोग्य, आणि ती तशी का? आणि ती कुठल्या किंवा कुणाच्या दृष्टिकोनातून, या सगळ्याकडे पाहण्याचा वस्तुनिष्ठ दृष्टिकोन असू शकतो का, आणि असला तर त्याचे मापदंड कुठले या सगळ्याची सोपी झटपट उत्तरं कदाचित असू शकतील, पण ती बहुतेकदा अपूर्णच असतील. तेव्हा हे सगळ मुळापासून अभ्यासाव लागेल. त्यासाठी वेळ लागेल. आणि त्यानंतरच या विषयावर निपक्षपणे काही मत मांडता येईल. ती प्रक्रिया सुरूच आहे. वेळखाऊ असली तरी जाणून घेण्याची तृष्णा भागविण्या चा आनंद देणारी आहे. असो. तर या कारणामुळे इथं मी कुठलही मत व्यक्त करत नसून निरीक्षण नोंदवत आहे किंवा तसं नोंदवण्याचा प्रयत्न करत आहे. असो. इति विषयांतर.)

राजकारणात राम केंद्रस्थानी येणं हे योग्य की अयोग्य, यावर प्रो आणि अँटी गटात वाद असू शकेल, आहे. पण निवडणुकीच्या तोंडावर किंवा एकूणच  राजकारणात राम केंद्रस्थानी येणं हे अपरिहार्यच होत. यात आश्चर्य वाटणं किंवा हे असं कसं होऊ शकतं यावर चर्चा करणं,हे मला विशेष वाटतं. अर्थात हे विशेष वाटणं हा माझ्या वर्तमानाकडे पाहण्या च्या प्रवासाचा भाग असेल. जसं मघाशी नमूद केलं की २०१८ पासून वातावरण राममय होण्यास सुरुवात झाल्याचं मला माझ्याच जुन्या नोंदीवरून जाणवलं. ती नोंद होती "राम मंदिराच बांधकाम सुरू झालं आणि काय आश्चर्य..." असं मी sarcastically काही लिहिल्याची. अयोध्या केसांदर्भात तेव्हा चर्चा सुरू असेल, त्यावेळी माझी ती प्रतिक्रिया होती. अर्थात मी अँटी बाजूकडे जास्त झुकलेलो होतो. आणि आताही मध्यभागी येऊन सगळं वस्तुनिष्ठ पणे पाहण्याच्या प्रयत्नात आहे. पण तरीही अजून मध्ये येण्याचा प्रयत्न चालूच आहे, आणि तो अँटी कडून मध्यभागी येण्याचा प्रयत्न आहे. माझ्यात या प्रक्रियेदरम्यान काय बदल झाला? मी परवा दिवशीपासून या विषयावर सगळीकडे सुरू मंथन पाहतोय आणि माझ्या आत ही त्याची प्रतिक्रिया म्हणून होणारं मंथन ही पाहतोय. २०१८ साली जसं उद्वेगाने वर नमूद नोंद लिहिली होती, तो उद्वेग आता तेवढ्या प्रमाणात शिल्लक नाहीय. आता झटकन प्रतिक्रिया द्यावीशी वाटत नाही. भवतालाच फक्त निरीक्षण करावं वाटतं. तो हळूहळू समजून घ्यावा वाटतो. अर्थात, चर्चा करताना समविचारी अँटी गटात काही नाराजी मी व्यक्त करतोही. पण ती चर्चेची गरज असते, आणि ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते, आतापर्यंत घट्ट झालेल्या न्युरोंस च्या जाळ्यांची. पण जेव्हा भवतलाच निरीक्षण करत असताना मनात विचार सुरू असतात तेव्हा मात्र उद्विग्नता तेवढ्या जास्त प्रमाणात जाणवत नाही.

उद्या (२२ जानेवारी २०२४)  राम लल्ला च्या मूर्तीची प्रतिष्ठापना आहे. त्यानिमित्त महाराष्ट्रात सुटी जाहीर केली आहे. याविरुद्ध लॉ कॉलेजच्या विद्ध्यार्थ्यानी जनहित याचिका दाखल केली होती. फेसबुक वर काही अँटी गटातील लोकांनी सुटीच्या विरुद्ध पोस्ट्स टाकल्या आहेत. काही कट्टर अँटी गटात असणाऱ्या पण संख्येने अतिशय कमी असणाऱ्या परीचीतानी उद्याच्या कार्यक्रमाबद्दल नाराजीच्या पोस्ट्स टाकल्या आहेत.नाहीतर जवळजवळ सर्वांनी अर्थात कट्टर प्रो, प्रो, प्रो नसूनही नेहमीच उत्सवप्रिय - स्टेटस प्रिय असणारे, प्रो नसूनही धार्मिक असणारे, आणि प्रो नसून - इतके धार्मिक नसून - उत्सवप्रिय नसून peer pressure किंवा नमूद नसणाऱ्या इतर कुठल्याही कारणाने पण समाज माध्यमांवर असणाऱ्या बहुतेक जणांनी उद्याच्या कार्यक्रमाबद्दल काहीतरी share केलेलं आहे. नेहमीच्या सणांच्या / दिवसांच्या अनुभवावरून अशी खात्री आहे की उद्या स्टेटस आणि पोस्ट्स चा महापूर येणार आहे. (सदर नोंद याच महापुराचा भाग आहे. )

नोंद समाप्त.


- अभिजीत कदम.