Tuesday, 21 July 2026

राज्यघटनेत सामूहिक आणि वैयक्तिक जबाबदारीची तत्वे (principals of individual and collective responsibility) नमूद केलेली आहेत. एखादा मंत्री राष्ट्रपतींची / राज्यपालांची मर्जी असेपर्यंत पदावर राहू शकतो (अर्थात पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांची मर्जी). तसेच मंत्रिमंडळ विधिमंडळाला सामुहिकरीत्या जबाबदार असते. विधिमंडळाने अविश्वास ठराव (किंवा इतर मार्ग) मंजूर केला तर संपूर्ण मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. 

त्यापलीकडे असते नैतिक जबाबदारीचे तत्व (Principal of Moral Responsibility) जे राज्यघटनेत कुठेही नमूद नाही, परंतु स्वतंत्र भारताचा इतिहास पाहिला तर आपल्याला ते वेळोवेळी अमलात आणलेले दिसून येते. भारत हा खंडप्राय देश आहे. एखाद्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या एखाद्या विषयाबद्दल, ज्यामुळे जनसामान्यांचे (पब्लिक at large) मोठे नुकसान झालेले असेल किंवा इतर काही नकारात्मक घटना घडली असेल तर त्यासाठी बऱ्याचदा त्या खात्याचा मंत्री प्रत्यक्षरित्या जबाबदार नसतो किंवा त्याच्याकडून एखादी घटना जाणीवपूर्वक घडवलेली नसते. परंतु, अखेर त्या विषयाबद्दलची अंतिम जबाबदारी माझीच होती आणि मी माझं कर्तव्य करण्यात अप्रत्यक्षरित्या का होईना कमी पडलो असा त्या मंत्र्याचा विवेक त्याला सांगत असतो. तेव्हा त्या विषयाची नैतिक जबाबदारी स्वतःची आहे असं समजून आतापर्यंत अनेक संवेदनशील मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. रेल्वे अपघातात रेल्वे मंत्र्याची प्रत्यक्षपणे काय चूक असू शकते? पण या देशाने याचीही नैतिक जबाबदारी स्वीकारून माननीय मंत्र्यांनी राजीनामा दिल्याचे पाहिले आहे. अशा कृतीमुळे झालेली चूक, गेलेले जीव परत येत नाहीत. परंतु यातून आपला सद्सद्विवेक शाबूत असल्याचे, आणि आपले अंतिम साध्य काय आहे याबद्दल आपण जागरूक असल्याचे तो व्यक्ती सांगत असतो. असेच ही कृती इतर मंत्र्यांसाठी, व्यवस्थेसाठी आपापल्या जबाबदारीची जाणीव करून देणारी असते. सत्ता, पद हे साधन आहे, "आम्हा भारतीय लोकांना (Us, the people) राजकीय, आर्थिक, सामाजिक न्याय देण्यासाठीचे", या साध्यासाठीचे. राजीनामा दिल्याने शिक्षणव्यवस्थेतील प्रश्न अजिबात सुटणार नाहीत, "...and they lived happily thereafter" टाईप अवस्थाही तत्काळ येणे कदापि शक्य नाही. 

मुद्दा हा नाही की मुलांची मागणी योग्य आहे किंवा नाही, तुम्हाला कुठली विचारसरणी योग्य वाटते, राजीनाम्याने काय फरक पडेल, कार्यवाही तर सुरू आहेच की वैगेरे... मुद्दा परत हाच आहे की लोकशाहीमध्ये संवाद जिवंत ठेवायचा आहे की नाही? तुम्ही या मुलांकडे कसे पाहता? यांना तुम्ही तुमची मुलं मानता की नाही? दर्जा आणि संधीची समानता याबद्दलच्या प्रश्नांना मांडण्यासाठीचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला ठेवायचे आहे की नाही? काँग्रेसनेही आंदोलनं दडपली होती, म्हणून Whataboutery ("त्यांनी तर तसं केलं होतं, तेव्हा तुम्ही कुठं होता", असली विधानं करून मूळ प्रश्नाला बदल देण्याची पासष्टावी कला!) करून आताच्या कार्यपद्धतीकडे आपणाला डोळेझाक करता येईल का? त्याने विहिरीत उडी मारली म्हणून तुम्ही पण मरणार का? (याला समांतर असणारी बोलीभाषेत आणखी मार्मिक म्हण आहे!). 

मोठ्या काळाच्या परिप्रेक्षात आताचे हे काही दिवस एक ठिपक्यासारखे आहेत. पुढच्या आठवड्यात कदाचित काहीतरी नव्या मुद्द्यावर आपण चहा पिताना गप्पा मारत असू, आपापल्या विचारसरणीची पाठराखण करणार असू. राजकीय प्रवाह हे दीर्घकाळ चालणारे असतात. स्वातंत्र्योत्तर कालखंड पहिला तरी काँग्रेसचा एकखांबी तंबू - एक पक्ष पद्धत पासून प्रवास सुरू होऊन तो हळूहळू स्थित्यंतरातून बहुखांबी यूपीए ते दोन आकडी खासदारांपर्यंत येऊन पोहोचला. तर दुसरीकडे जनसंघ - जयप्रकाश आंदोलनोत्तर जनता पक्ष - भाजप - दोन खासदार ते एकखांबी तंबू ते तंबूत नावापुरते घ्यावे लागलेले दोन छोटे टेकू इथपर्यंत स्थित्यंतरं झाली, आणि हा प्रवाह लगेच अजिबातच खंडित होणार नाही. सध्यासारख्या तात्कालिक आंदोलनांनी तत्क्षणी प्रवाहात बदल घडेल असं समजणं हा भाबडेपणा आहे, असा माझा समज आहे. परंतु या प्रवाहातील अंतस्थ घटकांकडे डोळसपणे पाहताना कमी होत चाललेली संवेदनशीलता, वाढत जाणारी बधिरता आणि जाणवण्याइतपत वाढलेला विखार या गोष्टी वारंवार अस्वस्थ करायला लावणाऱ्या आहेत. 

भारताचा नेपाळ - श्रीलंका होणार नाही, अशी माझी खात्री (इच्छावजा) आहे. अराजकाच्या माध्यमातून येणारं परिवर्तन शाश्वत असण्याबद्दल माझ्या शंका आहेत. माझा उत्क्रांतीवर विश्वास आहे. असा बदल जो मुळांपासून सुरू होईल आणि हळूहळू सर्वत्र पसरत जाईल. तसंच भारताचा रशिया - चीनदेखील होणार नाही, अशीदेखील माझी निश्चितच खात्री (अपेक्षावजा) आहे. अतिराज्याच्या माध्यमातून जनसमूहातील, नागरिकांमधील संपणारा जिवंतपणा मला ऑर्वेलच्या भयकथांची झोप उडवणारी आठवण करून देतो. 

मी आशावादी आहे. कारण माझ्या एका आवडत्या सिनेमामधील माझं एक खूप आवडतं वाक्य आहे ... "Hope is a good thing, maybe the best of things, and no good thing ever dies."


अभिजीत | २२ जुलै २०२६. 

No comments:

Post a Comment