सध्याचा भवताल हा एक मोठ्या दीर्घकालीन प्रवाहाचा भाग आहे, आणि अशा तात्कालिक कारणांनी प्रवाह खंडित होत नसतो, होणार नाही याची अनुभवजन्य खात्रीदेखील होती, आहे. प्रवाह समजून घ्यायचे असतात, आणि नागरिक म्हणून आपल्या अधिकारात असलेल्या मार्गांचा उपयोग करून आपली भूमिका पार पाडून त्यापलीकडे फक्त द्रष्टा होऊन प्रवाह समजून घ्यायचा असतो. अस्वस्थतेकडेही निरपेक्ष भावाने पाहायची सवय करून घ्यायची असते. कारण मोठमोठाले प्रवाह व्यवस्थेत हळूहळू निर्माण होत असतात, दीर्घकाळ टिकून राहत असतात आणि कालांतराने त्यात हळूहळू स्थित्यंतर होत असतं हे लक्षात येत गेलं. सत्तर - ऐंशी वर्ष हा काळाचा खूप लहान तुकडा असतो. आपण आपल्या वाट्याचं आणि आपल्याला शक्य असणारं कर्तव्य पूर्ण करायचं असतं. प्रत्येक पिढीमध्ये अस्वस्थ करणारं काहीतरी असतंच. असा समज गेल्या दहाएक वर्षांमध्ये दृढ होत गेला आणि तो सबळ होत आहे. प्रवाहाकडे वस्तुनिष्ठपणे पाहण्याचा प्रयत्न करणे, आणि आपली या प्रवाहातील भूमिका, कर्तव्य निष्काम भावनेने, तठस्थ राहून न चुकता पार पाडणे, याचाच प्रयत्न करत असतो. परंतु काहीवेळा अस्वस्थता खूप वाढते आणि व्यक्त होणे गरजेचे होते. दीर्घकालीन भूमिका तर वर सांगितली तशीच असेल, पण आता व्यक्त होणं कर्तव्याचा भाग असल्याचं वाटत आहे.
आंदोलकांच्या भाबड्या आशावादाबद्दल किंवा हेतूबद्दल मला माझ्या शंका होत्या, आक्षेप होते, आहेत. आणि एखाद्या नेहमीच्या ट्रेंडसारखं कुठल्याही तार्किक समारोपापर्यंत विषय न जाता च्युइंगम सारखं लोकं (यामध्ये मी पण गृहीत आहे.) विषय चघळून थुंकून नवीन विषय चघळायला घेतील अशी अटकळ होती, आहे.
पण आजचा प्रश्न हा नाही की साधेपणा हा सद्गुण असेल तर तो तुमचे हेतू निष्पाप असण्याचा एकमेव निकष ठरू शकतो का? आजचा प्रश्न हा नाही की FOMO मुळं तुम्ही स्टेटस ठेवत आहात काय? आजचा प्रश्न माझ्या, तुमच्या भाबडेपणावरदेखील नाही, थंडपणावर नाही की निष्क्रियपणे पाहण्याबद्दलही नाही.
आजचा प्रश्न हा नाही की मी, तुम्ही कुठल्या वैचारिक प्रवाहाचे समर्थक आहात. आजचा प्रश्न हा नाही की या आंदोलनाने काय साध्य होणार होतं?
आजचा, समोर उभा ठाकलेला प्रश्न हा आहे की लोकशाहीचे व्यवच्छेदक लक्षण असणारे विचार, अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, मतभेद, मतांतरे यांचा अवकाश अबाधित ठेवला जाणार आहे की नाही?
आजचा प्रश्न आहे की भारतीय (हिंदूही म्हणुच शकता) तत्त्वज्ञानाचा भाग असणारे खंडन- मंडन, वाद -प्रतिवाद आणि त्याची अभिव्यक्ती जिवंत ठेवली जाणार आहे की नाही?
आजचा (निरर्थक ) प्रश्न हा देखील आहे की वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदाऱ्या, उत्तरदायित्व या गोष्टी नामशेष झाल्या आहेत काय?
आजचा प्रश्न रोम जळत असताना निरो काय वाजवत होता हा अजिबात नाही, अपेक्षित नाही, उपयोगी अजिबात नाही. आजचा प्रश्न आहे व्यवस्था निर्ढावला होण्याच्या काळात, त्या संक्रमण अवस्थेत मी काय करत होतो?
आजच्या दिगु टिपणीसला मारुती कांबळेचं काही पडलेलं आहे की नाही???? आजचा हिंदुराव मास्तरांची दखलही न घेता त्यांना चौकातूनच गायब का करत आहे??? आजचा प्रश्न हा नाही की मारुती कांबळेने काय प्रश्न विचारला होता, तर प्रश्न हा आहे की मारुती कांबळेला आज प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य शिल्लक राहीलं आहे का????
माझा सद्सद्विवेक आज मला ओरडून ओरडून हे प्रश्न वारंवार विचारत आहे, अस्वस्थ करत आहे.
- अभिजीत | १९ जुलै २०२६.
No comments:
Post a Comment