Saturday, 11 July 2026

उताविळ चीड

 आज तिसऱ्यांदा अक्षरधारा मान्सून प्रदर्शनाला गेलो होतो. 

जवळपास दोन हजारांची आणखी काही पुस्तके आणली. गणेश मतकरी आले होते. त्यांना "सिनेमॅटिक", "फिल्मेकर्स" वाचलीत आणि "बिब्लिओफाईल" अर्ध वाचल्याचं सांगितलं. मग त्यांची सही घेण्यासाठी धावपळ, मग "फ्री फॉल" आणि "खिडक्या अर्ध्या उघड्या" घेतली आणि त्यांवर त्यांची सही घेतली, त्यांचे फोटो घेतले. विजय देवधरांच्या हिचकॉक कथांबद्दल त्यांच्याशी चर्चा करून दोन्ही भाग विकत घेतले. 


नंतर इतर पुस्तके घेतली. 


आता प्रश्न असा आहे की अवधान असताना उताविळपणा कसा येतो? अवधान असताना चीड कशी येते? आणि प्रतिक्रिया कशी असायला हवी? परिघातील इतरांना प्रभावित करण्याच्या अंतस्थ हेतूने स्वतःची कीव करत चिडेच्या अस्तराखाली असलेली प्रतिक्रिया अवधानात असल्यावर लगेच लक्षात येते. विवेकपूर्ण प्रतिक्रिया देण्याचा विचार येऊन तशी कृती घडत जाते. पण समान उद्दीपनाची पुनरावृत्ती झाली की मात्र विवेकपूर्ण प्रतिक्रिया देणे अवघड होऊन बसते. अशावेळी मात्र चीड अवधानाला पार करून जाते, नुसती पार करत नाही तर प्रभावित करून जाते. निमिषमात्र अवधान उरतं. नैसर्गिक उत्तेजीत प्रतिक्रिया एखाद्या इंधनाला ठिणगी मिळावी तशी प्रज्वलित होते, विस्फोट होतो. 


मग पश्चातबुद्धी म्हणून या सगळ्याचा विश्लेषणात्मणक विचार करण्याची उरापती होते. अर्थात, यातून जे साररूपी सूत्र मन:चक्षुसमोर दृष्टीक्षेपात येते ते अवधानाचा स्थायीभाव व्हावे अशी सदिच्छा व्यक्त करून इतिश्री करत आहे.

No comments:

Post a Comment